Ticker

6/recent/ticker-posts

हॉटेलमधील उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कायमस्वरुपी बंदी घाला - डॉ. माधव हिवाळे यांची मागणी - भिमसंग्राम संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


हॉटेलमधील उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कायमस्वरुपी बंदी घाला
डॉ. माधव हिवाळे यांची मागणी : भिमसंग्राम संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
वाशीम - महाराष्ट्रात कोरोना विषाणूपासून उद्भवलेल्या नोवेल कोविड-19 या आजाराच्या अनुषंगाने  साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार राज्यातील हॉटेल व प्रतिष्ठानांमध्ये उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीवर कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी  भिमसंग्राम सामाजीक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी केली आहे. यासोबतच हॉटेलची संपुर्ण स्वच्छता, कर्मचार्‍यांच्या स्वच्छतेसह स्वच्छ पोशाख, ग्राहकांना साबणाने हात धुण्याची सुविधा आदी नियम लागु करुन कायद्याचे पालन न करणार्‍यांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणीही हिवाळे यांनी केली असून यासंदर्भात 10 एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे व प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांना तशा आशयाचे निवेदन पाठविले आहे.
 निवेदनात डॉ. हिवाळे यांनी नमूद केले आहे की, कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे आज संपुर्ण जगात लाखो लोक कोविड-19 या आजाराने पिडीत झाले असून हजारो लोक मृत पावले आहेत. भारतातही या रोगाने थैमान घातले असून आतापर्यत भारतातील अनेक राज्यांमध्ये या संसर्गजन्य आजाराने हजारो लोकांना आपल्या राक्षसी विळख्यात घेतले आहे. त्यामुळे संपुर्ण देशात साथरोग प्रतिबंधक कायदा लागु करुन लॉकडाऊन घोषीत करण्यात आले असून अनेक जिल्हे सॅनिटाईज करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूमुळे आज आरोग्य विभागाची फार मोठी जबाबदारी वाढली आहे. नागरीकांना इतर चैनीच्या बाबीपेक्षा आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे लागणार असून कोरोनासारख्या विषाणूपासून दुर राहण्यासाठी स्वच्छता हा जीवनमरणाचा केंद्रबिंदु समोर ठेवून घरी किंवा बाहेर काय खावे, काय खावु नये याकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. पुढील काळात कोरोनासारख्या संकटाला सामोरे जावे लागु नये यासाठी शासनालाही अधिकाधिक कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. यातीलच एक मोठा निर्णय म्हणजे राज्यातील सर्व खाद्यपदार्थाची विक्री करणार्‍या हॉटेलमध्ये उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीवर पुर्णपणे बंदी घालणे गरजेचे आहे. तसेच अशाप्रकारे कोणतेही हॉटेलचालक किंवा फेरीवाले उघड्यावर खाद्यपदार्थाची विक्री करुन नागरीकांच्या आरोग्याशी जिवघेणा खेळ करत असतील तर त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे. जेणेकरुन उघड्यावरील खाद्यपदार्थाच्या माध्यमातून नागरीकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही. यासह हॉटेलची संपुर्ण स्वच्छता, कर्मचार्‍यांच्या स्वच्छतेसह स्वच्छ पोशाख, ग्राहकांना साबणाने हात धुण्याची सुविधा आदी बाबींची पुर्तता केल्यास महाराष्ट्रात अशा प्रकारच्या विषाणूुंना काही प्रमाणात पायबंद लागु शकेल. याबाबत आपण महाष्ट्रातील नागरीकांच्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी डॉ. हिवाळे यांनी केली आहे.