Ticker

6/recent/ticker-posts

अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत तांदुळ वाटप लवकरच सुरु होणार : मोफत तांदुळ बाजारात विकला जाण्याच्या बातम्या तथ्यहीन - राज्य शासनाकडून ग्वाही


अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत तांदुळ वाटप लवकरच सुरु होणार
मोफत तांदुळ बाजारात विकला जाण्याच्या बातम्या तथ्यहीन - राज्य शासनाकडून ग्वाही
वाशीम - राज्यातील स्वस्त धान्य दुकानातुन रास्त भाव धान्य वितरण सुरळीत सुरु आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना प्रतीव्यक्ती अतिरिक्त ५ किलो तांदुळ दरमहा मोफत देण्याचे शासनाचे आदेश आहेत. एप्रिल महिन्याचे धान्य पॉस मशीनवर उपलब्ध झाले असून मे, जून महिन्याचे धान्य त्या-त्या महिन्यात वितरीत होणार आहे. नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून धान्य उचलण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसात स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेणार्‍या लाभार्थीपैकी सुमारे ३०% धान्य उचलले आहे. उर्वरित धान्य उचलण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेतील मोफत तांदूळवाटप लवकरच सुरु होईल. मोफत वाटपासाठी आलेला तांदूळ पैसे घेऊन विकला जात आहे’, अशा तक्रारी प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत, तथापि मुळात मोफत तांदळाचे वाटपच अजून सुरू झाले नसल्याने या बातम्या तथ्यहीन आहेत. मोफत तांदूळ वाटपासाठी भारतीय अन्न  महामंडळाच्या गोदामांमधून धान्याची वाहतूक सुरु झाली आहे, अशी माहिती राज्य शासनाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे किराणा दुकाने ही अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत उघडी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती शासनाने दिली आहे.
 अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य यामध्ये १५ किलो गहू व २० किलो तांदूळ मिळणार आहेत. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मिळणार आहेत. तसेच एपीएल (शेतकरी) लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ४ किलो गहू आणि १ किलो तांदूळ वितरीत केले जाणार आहेत. सर्व लाभार्थ्यांना प्रतिकिलो २ रुपये दराने गहू आणि प्रतिकिलो ३ रुपये दराने तांदूळ मिळणार आहेत. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना २० रुपये प्रतिकिलो दराने १ किलो साखर मिळणार आहे.
  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना (अंत्योदय व प्राधान्य कुटुंब) प्रतिव्यक्ती दरमहिना अतिरिक्त ५ किलो तांदूळ शासनाने ३१ मार्च २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर केले आहेत. हे अतिरिक्त धान्य लाभार्थ्यांना मोफत मिळणार आहे. त्याचे सुध्दा दरमहा वाटप केले जाणार आहे. पुढील आठवड्यापासून अंत्योदय व प्राधान्य कार्डधारकांना चालू महिन्याचे प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. जाधव यांनी कळविले आहे.