Ticker

6/recent/ticker-posts

वाशीम जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांना नऊ एप्रिलपासून मोफत तांदूळ वितरण : साठेबाजी व चढ्या दराने वस्तूंची विक्री केल्यास दुकानदारांवर कारवाई


वाशीम जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांना नऊ एप्रिलपासून मोफत तांदूळ वितरण
साठेबाजी व चढ्या दराने वस्तूंची विक्री केल्यास दुकानदारांवर कारवाई
वाशीम - प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जून दरम्यान प्रतिलाभार्थी प्रतिमहिना 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहेत. पात्र शिधापत्रिकाधारकांनी नियमित स्वरुपात धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने केली आहे. त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य घेतल्यानंतर प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ उपलब्ध करून जाईल. याकरिता तांदळाचे नियतन गोंदिया जिल्ह्याकडून प्राप्त करून घेतले जात असून 9 एप्रिलपासून पात्र लाभार्थ्यांना तांदळाचे वितरण सुरु होणार आहे. मे आणि जून महिन्याचे मोफत तांदूळ त्या-त्या महिन्यात वितरीत केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे.
 यासोबतच वाशिम जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, याकरिता शासकीय यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व भाववाढीच्या काही ठिकाणहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री करणार्‍यांवर संयुक्त कारवाई करण्याचे आदेश पुरवठा विभाग, वैधमापन शास्त्र विभाग व पोलीस यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे 2 हजर 904 शिधापत्रिकाधारकांना ते जेथे राहत आहेत, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टेबिलिटी सुविधेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सांगितले.