Ticker

6/recent/ticker-posts

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी कृषी यंत्रणा, चारचाकी व दुचाकी सुटे भाग विक्री व दुरुस्तीची दुकाने सुरु ठेवा : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांची प्रशासनाकडे मागणी


शेतकर्‍यांच्या मदतीसाठी कृषी यंत्रणा, चारचाकी व दुचाकी सुटे भाग विक्री व दुरुस्तीची दुकाने सुरु ठेवा
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांची प्रशासनाकडे मागणी
रिसोड, 8 एप्रिल - 15 एप्रिलपर्यत जिल्हयात संचारबंदी काळात शेतकर्‍यांना मदत व्हावी यासाठी कृषी यंत्रणा, चारचाकी व दुचाकी सुटे भाग विक्री व दुरुस्तीची दुकाने सुरु ठेवण्याची मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांनी 8 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
 या निवेदनात ठाकूर यांनी नमूद केले आहे की, देशात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसंदिवस वाढतच असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन, प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस विभाग युध्दपातळीवर अहोरात्र काम करीत आहेत. त्यानुसार 15 एप्रिलपर्यत जिल्हयात संचारबंदीच्या अनुषंगाने अत्यावश्यक बाब वगळता सर्व दुकाने बंद आहेत.
 संचारबंदी काळात शेतीची कामे करण्यास व कृषी केंद्र धारकांना काही तासाची दुकान सुरू करण्याची सूट दिली आहे. सध्या शेतामध्ये उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी बांधवांकडे शेतामधील मशागत करण्याकरता दोनच महिने शिल्लक आहेत. या कालावधीत नांगरणे, वखरणे, खताची साठवणूक करून ठेवणे, शेतीला नीटनेटके करून घेणे या सर्व कामाकरीता शेतकर्‍यांना ट्रॅक्टर व मोटरसायकल हेच मुख्य माध्यम आहे. शेतकर्‍यांना ट्रॅक्टर व मोटरसायकल शिवाय कामे करणे शेतकर्‍यांना अशक्य आहे. या संचारबंदीमध्ये एसटी महामंडळासह सर्वच वाहतूक जवळपास बंद आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे ट्रॅक्टर शेतामध्ये नादुरुस्त होणे, ट्रॅक्टरचे एखादे पार्ट तुटणे, त्यासाठी स्पेअर पार्टची आवश्यकता भासु शकते. तसेच ट्रॅक्टरकरिता डिझेलचा पुरवठा करण्याकरता शेतकर्‍यांना मोटरसायकल शिवाय पर्याय नाही. परंतु संचारबंदीमुळे वाहन दुरुस्ती किंवा सुटे भाग संबंधी दुकाने बंद असल्यामुळे याबाबीचा शेतकर्‍यांना त्रास होवून या परिणाम शेतीवर होवू शकतो. शेतकरी बांधवांची ही अडचण लक्षात घेवून त्यांना दिलासा देण्याकरीता जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात किमान एखादे स्पेअरपार्ट व दुरुस्तीचे दुकान सुरु ठेवण्याची परवानगी देण्याबाबत विचार व्हावा अशी मागणीही ठाकुर यांनी केली आहे.