Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनावर विजय : बाधित 117 रुग्ण ठणठणीत : 25 हजार 753 नमुने निगेटीव्ह : राज्यातील स्थिती


कोरोनावर विजय : बाधित 117 रुग्ण ठणठणीत : 25 हजार 753 नमुने निगेटीव्ह : राज्यातील स्थिती
मुंबई,दि.8 :  राज्यात आज कोरोनाच्या 117 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या 1135 झाली आहे.  कोरोनाबाधित 117 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 942 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 27 हजार 90 नमुन्यांपैकी 25 हजार 753 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 1135 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 117 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  सध्या राज्यात 34 हजार 904 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 4444  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. 
             निजामुद्दीन येथील  झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 25 जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, बुलढाणा जिल्ह्यात 6 आणि  प्रत्येकी 2 जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर ,हिंगोली, जळगाव आणि वाशीम मधील आहे. 
            दरम्यान, आज राज्यात 8 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 72 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी 5 मुंबईत तर 2 पुणे येथे तर 1 कल्याण डोंबीवलीमधील आहे.
 राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. सध्या मुंबईत 645, बुलढाणा 198, वसई विरार मध्ये 183, मीरा भाईंदर मनपामध्ये 200 तर ठाणे मनपा मध्ये 331 सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण 3658 सर्वेक्षण पथके  काम करत असून त्यांनी 12 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.