Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनाला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट शेअर व फॉरवर्ड प्रकरणी कोल्हापूर, बीड, जालना, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद येथे 132 गुन्हे दाखल : ऑनलाईन फसवणूक प्रकरणी www.cybercrime.gov.in ला तक्रार करा


कोरोनाला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट शेअर व फॉरवर्ड प्रकरणी कोल्हापूर, बीड, जालना, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद येथे 132 गुन्हे दाखल : ऑनलाईन फसवणूक प्रकरणी www.cybercrime.gov.in ला तक्रार करा
मुंबई, दि. 8 : कोरोना महामारीला धार्मिक रंग देवून जनसामान्यांमध्ये आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी कोल्हापूर, बीड, जालना, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद सह राज्यातील विविध ठिकाणी सायबर विभागाकडून तब्बल 132 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आजपर्यंत राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 132 गुन्हे दाखल झाले असून 35 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये बीड 16, कोल्हापूर 13, पुणे ग्रामीण 11, मुंबई 9, जालना 8, सातारा 7, जळगाव 7, नाशिक ग्रामीण 6, नागपूर शहर 4, नाशिक शहर 5, ठाणे शहर 4, नांदेड 4, गोंदिया 3, भंडारा 3, रत्नागिरी 3, परभणी 2, अमरावती 2, नंदुरबार 2, लातूर 1, उस्मानाबाद 1, हिंगोली 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा राज्यातील काही गुन्हेगार व समाजकंटक घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सायबर सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे.
ऑनलाईन फसवणुकीपासून सावधानता बाळगण्याचे आवाहन
 महाराष्ट्र सायबर असे देखील नमूद करू इच्छिते की सध्या या लॉकडाऊनच्या काळात काही नवीन प्रकारच्या  सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. कोणत्याही वस्तूंची ऑनलाईन ऑर्डर करताना, बर्‍याचदा एका खोट्या संकेतस्थळाशी तुम्हाला जोडले जाते व मोबाईल नंबर विचारला जातो. मोबाईल नंबर दिल्यानंतर एक कॉल येतो व त्या संकेतस्थळावरील एक फॉर्म भरायला सांगितले जाते. ज्यामध्ये बँक अकॉउंटचे सर्व डिटेल्स, क्रेडिट/ डेबिट कार्डची सर्व माहिती विचारली जाते. त्यानंतर फोन वरील व्यक्ती आपल्या मोबाइलवर येणारा ओटीपी’ कन्फर्म करायला सांगते आणि कॉल डिस्कनेक्ट होतो. काही वेळात ग्राहकाला आपल्या बँक खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज येतो. सर्व नागरिकांनी अशी ऑनलाईन खरेदी करताना सतर्कता बाळगून आपले कोणतेही बँक डिटेल्स शेअर करू नयेत व असे काही घडल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर बँकेला तात्काळ कळवून आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. तसेच सदर गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा कळवावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केली आहे.