देशसेवेसाठी तत्पर महाराष्ट्र होमगार्डस बांधवांना शासनाच्या एका हाकेची प्रतिक्षा
महाराष्ट्र पोलीस रस्त्यावर, महाराष्ट्र होमगार्डस् मात्र घरातच
शासनाच्या उदासिन धोरणामुळे होमगार्ड बांधव देशसेवेपासुन वंचित
वाशीम - आज संपुर्ण देश करोना या महाभयानक शत्रुशी सामना करण्यासाठी सज्ज आहे. या देशातील लष्कर, पोलीस, डॉक्टर, नर्स, आशा सेविका इतकेच काय सर्वसामान्य जनताही देशातील कोरोना पिडीतांच्या उपचारासाठी जिवाचे रान करीत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून देशसेवेच्या आदेशाची वाट पाहणारे महाराष्ट्र होमगार्ड बांधव मात्र घरीच बसून असल्याची परिस्थिती महाराष्ट्रात दिसत आहे. देशातील सर्व घटकांच्या सोबतीला होमगार्ड बांधव तनमनधनाने सेवा करण्यास तयार असुन शासनाने होमगार्ड सैनिकांना देशसेवा करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी होमगार्ड बांधवांकडून होत आहे.
देशाचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी देशाच्या सुरक्षेसाठी सहाय्यक घटक म्हणून 6 डिसे.1946 रोजी प्रथम महाराष्ट्रात होमगार्डस् दलाची स्थापना केली. पुढे चालून या संघटनेने व्यापक रूप धारण करुन संपूर्ण भारतभर देश सेवा करण्याकरीता होमगार्डस् दलांची स्थापना करण्यात आली. मुख्यत: होमगार्डस् जवानांना वेगवेगळ्या आपत्ती व्यवस्थापणाचे प्रशिक्षण देऊन त्या त्या परिस्थितिंचे नियंत्रण करण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्यावर पाठवले जाई. आज मात्र संपूर्ण जगभरासह भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रातही कोरोना रोगाच्या विषाणूंचे थैमान असताना पोलिसांच्या दिमतीला महाराष्ट्रातील होमगार्डस् जवान जवळ जवळ कुठेच दिसत नसल्याची परिस्थिती आहे.
काही जिल्ह्यांचा पर्याय वगळता मोजक्याच जवानांना कामावर बोलावले जाते याला कारणही तसेच आहे. मागील फडणवीस सरकारने महाराष्ट्रात या जवानांना 670 रू. मानधन आणि किमान 180 दिवसांचे काम दिले होते. मध्येच निवडणूका पार पडल्या. त्यानंतर तत्कालीन सरकारच्या बर्याच योजना बदलत असताना यात काही धोरणांचा महाराष्ट्रातील होमगार्डस् दलास मोठा फटका बसला आहे. सरकारने होमगार्डस्च्या जवानांचे मानधन थकवत पुढील बंदोबस्त व कर्तव्य देण्याकरीता आर्थिक स्थिति व होमगार्डस् करीता त्यांना निधीच ऊपलब्ध होत नाही म्हणून सरळ कामावरून घरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र होमगार्डस् सैनिक हे शासनाने केंव्हांही बोलावले तर आपले ईतर मोलमजूरी आणि उदरनिर्वाहाचे महत्वाचे काम आणि कटूंबाची सुरक्षा रामभरोसे सोडून ऊपस्थितच असतात. कारण एकीकडे नाही आले तर संघटनेतून कमी करण्याची भितीही त्यांना असते.
अतिशय कमी मानधन/रोजंदारीवर आणि तोकड्या सेवासुविधांवर प्रशिक्षित होमगार्डस् चे मनुष्यबळ हे शासनास महत्वाच्या बंदोबस्तावर पोलिसांना मदत म्हणून अस्तीत्त्वात आहे परंतु शासन यांचा कोरोणाच्या संकटात वापर करताना दिसत नाही.
नैसर्गिक किंवा मानव निर्मीत आपत्तींमध्ये, महत्वपूर्ण निवडणूकांचा बंदोबस्त असो महाराष्ट्रातील होमगार्डस् सैनिक हे आले नाहीत तर नवलच..! तसा होमगार्डस् चा ईतिहासही आहे. 1962 च्या भारत चीन युद्धामध्ये होमगार्डस्नी भारतीय सैन्याची मोठी मदत केलेली आहे. पुढे चालून 10 सप्टें. 1993 चा किल्लारी येथील भूकंपातील मदत कार्ये, एवढेच नाही तर 26/11/च्या आतंकी हल्ल्यात मुंबईत होमगार्डस् चा जवान छातीवर गोळ्या झेलत शहीद झाला आहे. एवढे प्रशिक्षित होमगार्डस् सैनिक असतानाही शासन यांना काम न देता या महामारीत ऊपासमारीचीच वेळ आणत आहे असेच म्हणावे लागेल.
कोरोनाच्या रुपाने देशावर उद्भवलेल्या संकटाच्या घडीत देशातील इतर सर्व घटक देशासाठी धावून जात असतंना महाराष्ट्र होमगार्डस दल घरी बसणे अशक्य आहे. या अतिआवश्यक घडीला या मातृभूमिची व येथील जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर व सज्ज असलेल्या या होमगार्डस बांधवांना शासनाच्या एका हाकेची प्रतिक्षा असून शासनाने आदेश दिल्यास सैनिक, पोलीस व डॉक्टर बांधवांच्या खांद्याला खांदा लावून देशावर आलेले हे संकट निश्चयाचे व आत्मविश्वासाने परतवून लावू असा विश्वास होमगार्डस बांधव व्यक्त करीत आहेत.