Ticker

6/recent/ticker-posts

सुविधेअभावी लहुजीनगर भागातील होम क्वारंटाईन नागरीकांची उपासमार : प्रशासनाने आरोग्यसेवेसह धान्यपुरवठा करावा : गुरुवारी थाली बजाव आंदोलनाचा इशारा


वाशीम - शहरातील राजस्थान महाविद्यालयाजवळील लहुजी नगर येथे काही दिवसापुर्वी एक कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण निघाल्याने साथरोग कायद्यानुसार प्रशासनाने हा भाग हॉटस्पॉट झोन घोषीत करुन या भागातील नागरीकांना घराबाहेर निघण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या भागातील श्रमिक नागरीक गेले अनेक दिवसापासून होम क्वारंटाईनचे जगणे जगत असून हातावर पोट भरणार्‍या या नागरीकांची मोठी उपासमार होत आहे. प्रशासनाने ही बाब लक्षात घेवून या भागातील नागरीकांना आरोग्यसेवेसह धान्यपुरवठा करण्याची मागणी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने ८ जुलै रोजी जिल्हा पुरठा अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल न घेतलेल्या संघटनेच्या वतीने गुरुवार, ९ जुलै रोजी थाली बजाव आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष भाई जगदीश इंगळे यांनी दिला आहे.
    निवेदनात नमूद आहे की, लहुजीनगर परिसरात कोरोना रुग्ण निघाल्यामुळे मागील दहा दिवसापासून येथील संपूर्ण परिसर क्वारंटाईन करुन पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे हातावर पोट भरणार्‍या येथील श्रमिक, कामगार व मजुरदार वर्गाचे सर्व कामधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोट्यावधी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीता जमा झाले असतांना सुध्दा क्वारंटाईन परिसरातील लोकांची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था प्रशासकीय यंत्रणेकडून केल्या जात नाही ही दुर्देवाची बाब आहे. प्रशासनाकडून लहुजीनगर भागातील नागरीकांना सुविधा पुरविण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे लोकांना उपपसमारीचा सामना करावा लागत आहे. संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार या परिसरात अ.भा. मातंग संघाचे विदर्भ अध्यक्ष संजय वैरागडे, मानवी हक्क सुरक्षा दलाच्या डॉ. रेखा रणबावळे, मुख्य संयोजीका सौ. शिलाताई मेश्राम आदींनी पाहणी केली असता याठिकाणी नागरीकांना कोणतीही सुविधा मिळतांना दिसली नाही. अनेक जण केवळ भातावरच दिवस काढत आहेत. उपासमारीमुळे या परिसरात आजारग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने नागरीकांना आरोग्य सेवेसहीत धान्य पुरवठा करावी अन्यथा मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने क्वारंटाईन परिसरात ९ जुलै रोजी थाली बजाव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.