Ticker

6/recent/ticker-posts

महास्वयंम’ संकेतस्थळावर मिळणार रोजगाराच्या संधींची माहिती : बेरोजगार युवकांनी नोंदणी करावी : उद्योजकांसाठीही विविध सुविधा उपलब्ध


महास्वयंम’ संकेतस्थळावर मिळणार रोजगाराच्या संधींची माहिती
बेरोजगार युवकांनी नोंदणी करावी
उद्योजकांसाठीही विविध सुविधा उपलब्ध
वाशिम, दि. २४ (जिमाका) : राज्यातील उद्योगांमधील रोजगार संधींची माहिती बेरोजगार युवकांना ‘महास्वयंम’ अर्थात www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. तसेच याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून ‘महास्वयंम’ हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, यासाठी सदर तरुणांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसह ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार एखाद्या उद्योग अथवा आस्थापानाकडून त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होवू शकते. याशिवाय संकेतस्थळावर ‘नोकरी साधक’ (नोकरी शोध) याठिकाणी क्लिक केल्यानंतर रोजगार यादी, क्षेत्र स्थान व शिक्षणानुसार रोजगार संधीची माहिती मिळते. विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या रिक्त पदाच्या जाहिराती पाहण्यासाठी ‘रिक्तपदाच्या जाहिराती’ या टॅबद्वारे माहिती मिळू शकते.
शासकीय तसेच खाजगी अधिसूचित रिक्तपदांची माहिती, त्यासाठी उमेदवारी अर्ज करणे, राज्यभरात आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्याची माहिती मिळविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात सहभागी होणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
उद्योजकांसाठीही विविध सुविधा
‘महास्वयंम’ संकेतस्थळावर उद्योजकांसाठीही विविध सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांची माहिती, त्यांचे शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण याप्रमाणे एकत्रितरीत्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. याशिवाय उद्योजक म्हणून नोंदणी करणे, नवीन प्लांट शाखेची स्वतंत्र नोंद करणे, वेळोवेळी निर्माण होणारी रिक्तपदे अधिसूचित करणे, त्या अन्वये नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टीमद्वारे पुरस्कृत पात्र उमेदवारांची यादी मिळविणे, या पदाची विनामुल्य प्रसिद्धी करता येईल. तसेच उद्योजकांना सीएनव्ही कायदा अंतर्गत बंधनकारक असलेले त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्रही या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येणार आहे, असे श्रीमती बजाज यांनी कळविले आहे.