Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे जनार्दनला मिळाला पुनर्जन्म : डॉ. रणजीत सरनाईक व डॉ. अभय निर्बाण यांचे मोलाचे सहकार्य : जिल्हयातील १३ हॉस्पीटलचा योजनेत समावेश


महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे जनार्दनला मिळाला पुनर्जन्म
पॅरालिसीसच्या दुर्धर आजारावर डॉ. बिबेकर हॉस्पीटलमध्ये यशस्वी उपचार
डॉ. रणजीत सरनाईक व डॉ. अभय निर्बाण यांचे मोलाचे सहकार्य
जिल्हयातील १३ हॉस्पीटलचा योजनेत समावेश
वाशीम - सर्वसामान्यांच्या जीवनाला आरोग्याचे कवच देणार्‍या शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य या कॅशलेस योजनेमुळे शेतमजूर जनार्दन पवार यांना पुनर्जन्म मिळाला आहे. या योजनेतील अंगीकृत डॉ. बिबेकर हॉस्पीटलमध्ये पॅरॉलीसीस (लकवा) व क्षयग्रस्त मेंदूज्वर या दुर्धर आजाराने पिडीत जनार्दनवर यशस्वीरित्या व मोफत उपचार करण्यात आले. यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रणजीत सरनाईक व जिल्हाप्रमुख डॉ. अभय निर्बाण यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शेतमजूर पवार यांचा हजारो रुपयाचा खर्च वाचला आहे.
 रिसोड तालुक्यातील करंजी येथील शेतमजूर जनार्दन ग्यानबा पवार (वय ७१) यांना ८ एप्रिल रोजी एकाएकी पॅरालिसीसचा झटका आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नातेवाईकांनी त्यांना वाहनाने त्वरीत वाशीमला आणले. परंतु कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन असतांना शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये त्यांच्या उपचारासाठी नकाराचे अडथळे येत होते. त्यानंतर त्यांना वाशीम क्रिटीकल केअर सेंटर मध्ये भर्ती करण्यात आले. लॉकडाऊन काळात पवार यांच्यावर उद्भवलेल्या या परिस्थितीची माहिती येथील महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रणजीत सरनाईक व जिल्हाप्रमुख डॉ. अभय निर्बाण यांना मिळताच त्यांनी त्वरीत वाशीम क्रिटीकल मध्ये जावून रुग्णाच्या आजाराची माहिती घेतली. पवार यांना गेल्या १० वर्षापासून मिरगीचा आजार होता. यासोबतच आता ते लकवा व क्षयग्रस्त मेंदुज्वराच्या आजाराने पिडीत झाले होते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये लकवा या दुर्धर आजाराचा समावेश असल्याने डॉ. सरनाईक व डॉ. निर्बाण यांनी रुग्णाला विश्‍वासात घेवून वाशीम क्रिटीकल केअरच्या संचालकांकडे पवार यांना दुसर्‍या रुग्णालयात नेण्यासाठी सुटी देण्याची विनंती केली. पवार यांना तेथून सुटी मिळताच त्यांना डॉ. बिबेकर यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर डॉ. सरनाईक व डॉ. निर्बाण यांनी रुग्ण जनार्दन पवार यांच्या प्रकरणात जातीने लक्ष घालून त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लागणार्‍या सर्व कागदपत्रांचे मार्गदर्शन करुन या योजनेत पवार यांची नोंदणी करुन उपचार सुरु करण्यात आले. वैद्यकिय क्षेत्रात अतीगंभीर व दुर्धर आजारावर यशस्वी उपचारासाठी नावाजलेल्या डॉ. अरुण बिबेकर यांनी जनार्दन पवार यांच्या विविध तपासण्या करुन त्यांच्यावर सलग एक महिना यशस्वीरित्या उपचार केले. डॉ. बिबेकर यांची तपस्या फळाला येवून एक महिन्याच्या सलग उपचारानंतर जनार्दन पवार हे पॅरालीसीसच्या आजारातून बाहेर येवून ठणठणीत बरे झाले. ८ एप्रिल रोजी पवार यांना व्हीलचेअर वरुन रुग्णालयात आणल्यानंतर ४ मे रोजी ते स्वत:च्या पायाने चालत घरी गेले. यावेळी महिनाभर पवार यांचा मोफत उपचार व दोन वेळच्या जेवणासह जातांना परतीचे वाहन भाडे देवून त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. परत जातांना जनार्दन पवार यांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेसह या योजनेतील प्रमुख डॉ. रणजीत सरनाईक, डॉ. अभय निर्बाण व डॉ. बिबेकर यांचे आभार मानुन शासनाच्या या योजनेमुळे माझ्यासारख्या गरीब शेतमजूराचे हजारो रुपये वाचून मला पुनर्जन्म मिळाल्याचे नमूद केले.
 या योजनेबाबत अधिक माहिती देतांना डॉ. रणजीत सरनाईक व डॉ. अभय निर्बाण म्हणाले की, ०२ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने ही योजना सुरु झाली व १३ एप्रिल २०१७ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्यस्थितीत महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत अशा दोन्ही योजना मिळून एकूण १३४९ गंभीर व दुर्धर आजारावर विविध अंगीकृत रुग्णालयात उपचार करण्यात येतात. पिवळे, केशरी व पांढरे अशा तीन्ही रेशनकार्ड धारकांना ही योजना लागु आहे. जिल्हयात वर्ष २०१३ पासून एकूण २२६३६ लाभार्थ्यांना ३७५२१ इतक्या शस्त्रक्रिया व मोफत उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये किडनीच्या आजारात डायलीसीसच्या परत परत लागणार्‍या उपचाराचा समावेश आहे. शासनाच्या नवनव्या आजाराचा या योजनेत समावेश करण्यात येत असून नुकनेच डबल्युएचओने महामारी म्हणून घोषीत केलेल्या कोरोनाच्या सहा प्रकारच्या उपचारांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेमध्ये शासन उपचाराची रक्कम देत असल्याने यामुळे अनेकांचे जीव वाचत आहेत. जनसामान्यांना या योजनेची जास्तीत जास्त माहिती होवून त्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाच्या वतीने जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टरांच्या उपस्थितीत शिबिरे आयोजीत करण्यात येवून त्याव्दारे लोकांना माहिती दिल्या जाते. याशिवाय या योजनेतून नियुक्त केलेले आरोग्यमित्र विविध रुग्णालयात दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांची माहिती घेवून त्यांना या योजनेची माहिती देतात. शिवाय उपचाराची माहिती, मार्गदर्शन व अंगीकृत हॉस्पीटलची माहिती देतात.
 आयुष्मान भारत योजनेत सामाजिक, जातीय आणि आर्थिक निकषांच्या आधारावर जिल्हयात १ लाख ३५ हजार परिवारांचा समावेश झाला असून रेशनकार्डवर नमुद एका परिवारातील सर्व सदस्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत वर्षाला दीड लाख, किडनीच्या आजारासाठी अडीच लाख तर आयुष्यमान भारत योजनेत पाच लाख इतका वैद्यकिय लाभ देण्यात येतो..
 सध्यस्थितीत या दोन्ही योजनेसाठी जिल्हयातील एकूण १३ रुग्णालयात अंगीकृत असून त्यामध्ये बिबेकर हॉस्पीटल, वाशीम क्रिटीकल केयर सेंटर, देवळे हॉस्पीटल, कानडे बाल रुग्णालय, माँ गंगा बाहेती हॉस्पीटल, वोरा हॉस्पीटल, लाईफलाईन हॉस्पीटल, लोटस हॉस्पीटल, बाजड हॉस्पीटल, बालाजी बाल रुग्णालय या खाजगी हॉस्पीटलसह जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय व मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे.