Ticker

6/recent/ticker-posts

अवघ्या पाच पाहूण्यांच्या उपस्थितीत शुभमंगल सावधान - मास्क आणि सॅनिटायझरचा वापर


अवघ्या पाच पाहूण्यांच्या उपस्थितीत शुभमंगल सावधान
नावली ग्रामपंचायतचा पुढाकार : मास्क आणि सॅनिटायझरचा वापर
वाशीम - कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमिवर रिसोड तालुक्यातील ग्राम नावली येथे ग्रामपंचायतच्या पुढाकारातुन कोणताही खर्च न करता अवघ्या पाच पाहूण्यांच्या उपस्थितीत १५ एप्रिल रोजी आदर्श विवाह पार पडला. यावेळी वधुवरांनी विवाहासमयी मास्क घालुन तसेच सॅनिटायझरचा वापर करुन सामाजीक अंतराचे नियम पाळले.
 संचारबंदीच्या परिस्थितीत येनकेनप्रकारे गर्दी जमविण्यावर शासनाने  बंधने लादली आहेत. त्यामुळे ऐन लग्नसराईत विवाह सोहळ्यांवर बंधने आली आहेत. अश्या परिस्थितीत अनेक विवाह घरच्या घरी लावले जात आहेत. अशातच रिसोड तालुक्यातील नावली ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन गावातील नवर्‍या मुलीचा विवाह साध्या पद्धतीने घडवून आणला. नावली येथील दिवंगत पांडुरंग बाजड यांची मुलगी चि. सौ. कां. पूजा व रिसोड तालुक्यातीलच वाडी रायताळ येथील सुभाषराव मोरे यांचे चिरंजीव मृदंगाचार्य ज्ञानेश्वर यांचा नियोजित विवाह बुधवारी होता. त्यामुळे आधीच ठरल्याप्रमाणे  लॉकडाऊन नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने नवरदेव आपल्या आई वडिलांसह सकाळीच नावलीत हजर झाले. यावेळी ग्रामपंचायतमध्ये वधू वरांसह उपस्थितांना मास्क लावून आणि सॅनिटायझरचा वापर करून वधुवरांनी एकमेकांना हार घातले. आणि कुठलाही बडेजाव न करता तसेच कुठलाही अनावश्यक खर्च न करता विवाह लावण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने या विवाहाची नोंद करून विवाहाचे प्रमाणपत्र वधूवरांना सुपूर्द केले. ग्रामपंचायतच्या पुढाकारातून झालेला बहुधा हा जिल्ह्यातील पहिलाच विवाह असेल. या विवाहाला सरपंच गजानन बाजड, ग्रामसचिव सदाशिव रेखे, गुलाबराव शिंदे, गजानन गिरी यांची उपस्थिती होती. कोरोना महामारीमुळे देश आर्थिक मंदीतून जात असताना अशाप्रकारे विवाहावरील अनावश्यक खर्च टाळून देशहिताचे कार्य करणार्‍या ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.