Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) वाढविणे आवश्यक - डॉ. माधव हिवाळे


कोरोनाच्या मुकाबल्यासाठी रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) वाढविणे आवश्यक - डॉ. माधव हिवाळे
वाशीम - कोरोना विषाणूपासून होणारा नोवेल कोविड-१९ या आजारापासून स्वत:ला वाचविण्यासाठी नियमित मास्क घालणे, २० सेकंदापर्यत वारंवार साबणाने हात धुणे, संपुर्ण स्वच्छता व सामाजीक अंतर राखणे यासोबतच शरीरातील प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) वाढविणे या बाबी आवश्यक असून यामुळे आपण कोरोना विषाणूपासून स्वत:ला वाचवु शकतो असे मत शहरातील सुप्रसिध्द आयुर्वेद, निसर्गोेपचार व योगातज्ञ डॉ. माधव हिवाळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे व्यक्त केले.
 डॉ. हिवाळे पुढे म्हणाले की, आज जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून अमेरीका सारखे बलाढ्य देश अक्षरश: या आजारापुढे लोटांगण घालतांना दिसत आहेत. समोर दिसणार्‍या शत्रुपासून आपण बचाव करु शकतो. पण न दिसणार्‍या शत्रुपासून कसा बचाव करणार ? हे जगासमोर खुप मोठे आव्हान आहे. कोविड-१९ हा आजार रोखण्यासाठी दोन व्यक्तींमधील सामाजीक अंतर (सोशल डिस्टंन्सींग) हाच एक प्रभावी उपाय असून यामुळे आपण या आजाराचा प्रसार रोखु शकतो. यासोबतच आपली रोगप्रतिकारशक्ती हा पण या भयानक आजारावर मात करण्याचा प्रभावी उपाय आहे. आपण जेवढा चांगला व सकस आहार घ्याल, शरीराची व घराची संपूर्ण स्वच्छता राखाल तेवढ्या जास्त ताकदीनिशी आपण या गुप्त शत्रुचा मारा रोखु शकतो. काल माझ्या एका डॉक्टर मित्राचा फोन आला. तो सांगत होता, एरवी रुग्ण (पेशंट) बाहेर बसलेले असतांना मास्क लावून बसतात आणि आतमध्ये आल्यावर मास्क खाली सरकवून आपल्याला बोलतात. असे केल्यानेही हा गुप्त शत्रु आणखीन फोफावणार आहे. त्यासाठी योग्य ती काळजी (प्रिकॉशन) घेणे हा महत्वाचा मुद्दा आहे. जास्तीत जास्त संपर्क टाळणे, चेहर्‍यावर मास्क लावणे, चहामध्ये हळद किंवा तुळशीची पाने टाकुन जास्त प्रमाणात चहा पिणे, पंचतुळशी या औषधाचा वापर करणे, भाजीपाला व इतर वस्तु स्वच्छ धुवुन घेणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, लहान मुलं व ६० वर्षावरील वयोवृध्दांची जास्त काळजी घेणे महत्वाचे आहे. नियमित योगा, ध्यानसाधना करणे गरजेचे आहे. घरामध्ये ताप, सर्दी, खोकला इत्यादी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणून ठेवणे या बाबी प्रकर्षाने करणे आवश्यक आहे. या आजाराला रोखण्यासाठी घरी रहा, सुरक्षीत रहा, कोेरोनापासुन मुक्त रहा हा मुलमंत्र सर्वांनी कठोरपणे पाळुन स्वत:ला, समाजाला, पोलीस यंत्रणेला, आरोग्य विभागाला व शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. माधव आ. हिवाळे यांनी केले आहे.