Ticker

6/recent/ticker-posts

माविमच्या मार्गदर्शनात महिला बचत गटाची अभिमानास्पद कामगिरी : जिल्हयातील गरजुंना धान्य, मोफत भोजन व मास्कचा पुरवठा


माविमच्या मार्गदर्शनात महिला बचत गटाची अभिमानास्पद कामगिरी 
जिल्हयातील गरजुंना धान्य, मोफत भोजन व मास्कचा पुरवठा
वाशीम - कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी जिल्हयात सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे निराधार, दिव्यांगासह अतिगरीब कुटुंबे हवालदील झाले आहेत. अनेकांचा रोजगार बंद झाल्यामुळे घरखर्चासह दोन वेळचे जेवण कसे मिळेल या काळजीत नागरीक आहेत. अशा परिस्थितीत शासकीय विभाग, पोलीस विभाग, सहकारी संस्था, समाजसेवक, नागरीक ‘एकमेका साह्य करु’ या माणूसकीच्या भावनेने जमेल तशी अशा संकटग्रस्त नागरीकांना मदत करीत आहेत. यातीलच एक मदतीचे पाऊल म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शनात सहा तालुक्यातील माविम वाशीम व्दारा स्थापित सीएमआरसी अंतर्गत महिला बचत गटातील महीला स्वयंस्फुर्तीने गरजुंना धान्य, मोफत भोजनासह, मास्क व हॅन्डवॉशच्या पुरवठ्यासाठी पुढे सरसावले आहेत. या बचत गटांच्या मदतीमुळे अनेक निराधार व्यक्ती व अतिगरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिला बचत गटाच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे माणूसकीच्या हारामध्ये संवेदनेचे सुंदर फुल गुुंफल्या गेले आहे.
 लॉकडाऊन काळामध्ये हातावर पोट असणार्‍या कुटुंबांना धान्य कमी पडू नये व कोणीही उपाशी राहू नये या उदात्त हेतुने   महिला बचत गटामार्फत आजपर्यत 26 क्विंंटल धान्य वाटप करण्यात आले आहे. मालेगाव तालुक्यातील भेरा येथील पंचशिल गटामार्फत अतिगरीब अशा 30 महिलांना धान्य वाटप केले आहे. याशिवाय तीन महिला बचत गटाव्दारा सुरु केलेल्या तीन शिवभोजन सेंटरच्या माध्यमातून दररोज 250 थाळीचे वाटप करण्यात येत आहे. सोबतच दिव्यांग, अनाथ व गरजुंना या शिवभोजन केंद्रातुन मोफत भोजन देवुन माणूसकीचे नाते जोपासल्या जात आहे. काही बचत गटाच्या महिला अत्यंत कमी भावात मास्क बनवून देत आहेत. यामुळे जिल्हयात आतापर्यत 22150 मास्कची निर्मितीतुन 30 गरीब महिलांना रोजगार मिळाला आहे. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे व वडप येथील ग्रामपंचायत मार्फत गावातील प्रत्येक कुटुंबाला हॅन्डवॉश, साबण, फिनाईल वाटप करण्यासाठी सीआरपी आरजीबी सदस्यांची मदत मिळाली आहे. प्रत्येक कुटुंबाला घरपोच साहित्य पोहचविण्याचे काम महिला करत आहेत. सामाजीक दायित्वासाठी सतत पुढाकार घेणार्‍या महिला आर्थिक विकास महामंडळाचे मार्गदर्शन या महिला बचत गटातील महिलांना मिळत आहे.