Ticker

6/recent/ticker-posts

लॉकडाऊनच्या भरीस भर वादळी पाऊस आणि विजेचा खेळखंडोबा


लॉकडाऊनच्या भरीस भर वादळी पाऊस आणि विजेचा खेळखंडोबा
ग्रामस्थांचे हाल तर जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत
वाशीम - ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न’ या म्हणीप्रमाणे 21 दिवसाच्या कडेकोट लॉकडाऊनसमोर वादळी पाऊस आणि गारपीटीने जिल्हा प्रशासन आणि पोलीसा प्रशासनासमोर मोठे संकट उभे केले आहे. तर वादळी पावसासोबतच विजेच्या लपंडावामुळे जिल्हयातील ग्रामीण भागातील नागरीकांचे मोठे हाल होत आहेत. या सर्व बाजु सांभाळतांना जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला आगामी काही दिवसात तारेवरची मोठी कसरत करावी लागणार आहे.
 29 मार्चच्या रात्री 2 वाजताच्या दरम्यान वादळी वारा आणि पावसाचा फटका जिल्ह्यात बसला. वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे जिल्हयातील केकतउमरासह काही गावांमध्ये लाईन गेल्यामुळे ग्रामस्थांना अंधारातच रात्र काढावी लागली.
 लॉकडाऊनच्या नियमाचे नागरीकांनी पालन करावे म्हणून रात्रंदिवस शहरी तथा ग्रामीण भागात रात्रंदिवस खडा पहारा करणार्‍या पोलीसांना करोना आजारापासून स्वत:ला वाचविण्यासोबतच अन्नपाण्याची काळजी आणि आता वादळी पाऊस आणि गारपीटीचा सामना करावा लागत आहे. अशातच वादळी वारा आणि पावसामुळे जिल्हयातील अनेक ग्रामीण खेड्यांमध्ये विजेचा लपंडाव सुरु आहे. ग्रामीण भागात एकदा लाईन गेली तर ग्रामस्थांना रात्र अंधारातच काढावी लागते. अशावेळी  बाहेर झोपता येत नाही व घरातच झोपायचे म्हटले तर मोठ्यांचे सोडा पण लहान मुलांना मच्छर आणि गर्मी यापासून होणार्‍या त्रासाची कल्पना न केलेली बरी.
 25 मार्चच्या रात्री 12 वाजतापासून सुरु झालेल्या या 21 दिवसाच्या लॉकडाऊनच्या दरम्यान ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाचे आगमन सुरु आहे. जिल्हयातील ग्रामीण भागात वादळी वारा आणि पावसाचे आगमन झाल्यानंतर लाईन बेपत्ता होते. या दुहेरी संकटामुळे ग्रामस्थांच्या त्रासामध्ये भर पडत आहे. वादळी वार्‍यामुळे अनेक ग्रामीण भागात तारा तुटण्याच्या घटना घडत असून अशा ठिकाणी विजेचा पुर्ववत पुरवठा सुरु करण्यासाठी महावितरणच्या सैनिकांना डोळ्यात तेल घालुन आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. 18 मार्च रोजी रात्री वादळी पाऊस आणि तुफान गारपीटीने अख्खा जिल्हा झोडपून काढला. यावेळी तब्बल 20 मिनीटे चाललेल्या व जवळपास लिंबाच्या आकाराएवढ्या पडलेल्या या गारपीटीमुळे शेतकर्‍यांच्या शेतात होते नव्हते ती पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे एकतर 21 दिवस लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही, पोटाला भाकर नाही अशा परिस्थितीत हाती आलेली पिकेही निसर्गाने हिरावून नेली आहेत. या संकटाच्या वेळी शेतकर्‍यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी शासनाने अशा नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करुन त्यांना त्वरीत मदत द्यावी अशी मागणी सर्वस्तरातुन पुढे येत आहे. संकटाच्या या कठीण प्रसंगी शासनाने शेतकर्‍यांना मदतीचा हात न दिल्यास शेतकरी निराशेच्या गर्तेत खचून जावून आत्महत्येचा मार्ग धरु शकतो. 21 दिवसाच्या कठीण लॉकडाऊनच्या काळात करोना नाही तर भूकबळीनेही शेतकरी मरु शकतो. त्यामुळे स्थानिक जिल्हा प्रशासनाने या बाबीकडेही लक्ष देवून शासनाकडून मिळालेली मदत भ्रष्टाचारमुक्त वातावरणात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांपर्यत पोहचविल्यास अशा शेतकर्‍यांच्या मनाला मोठी उभारी मिळेल.