खाजगी संस्थांद्वारे कम्युनिटी किचन’चा निर्णय - अजित पवार
रराज्यातील मालवाहू ट्रकवाहतुकीला परवानगी
मुंबई, दि. 26 :- करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणार्या वाहनांना पोलिसांकडून अडविण्यात येणार नाही, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृह मंत्री अनिल देशमुख, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल आदींसह विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शेतीवापराचे ट्रॅक्टर, हार्वेस्ट्रर आदी वाहनांना पुरेसे पेट्रोल, डिझेल उपलब्ध करुन देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
शहरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरीब नागरिक, रस्त्यावर राहणारे बेघर नागरिक यांच्यासाठी नागपूर जिल्हाधिकार्यांनी खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने कम्युनिटी लंगर’ सुविधा सुरु केली आहे. त्याच धर्तीवर खाजगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सहकार्याने राज्यातील अन्य शहरात देखील कम्युनिटी किचन सुरु करण्यात यावेत, तसेच नागरिकांना रेडी टू इट’ किंवा रेडी टू कूक’ अन्नपदार्थ उपलब्ध करुन द्यावेत, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी केंद्र सरकारकडून जाहीर केलेल्या 1 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचे तसेच अन्य उपाययोजनांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे.
डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास सांगितल्यास घरमालक, हाऊसिंग सोसायटीवर होणार कारवाई
मुंबई, दि. 26 : राज्यात काही ठिकाणी भाडेतत्वावरील घरात राहणार्या डॉक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना करोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मानवतेच्या दृष्टीने तर हे अत्यंत चुकीचे आहेच, परंतु नियमबाह्यही आहे. घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावे. अन्यथा साथरोग नियंत्रण कायद्यानुसार संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई करण्यात येईल, असे शासनाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सध्या करोना विषाणु साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे करताना त्यांना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी त्यांच्यामार्फत तसेच प्रशासनामार्फत घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाही. असे असतानाही काही घरमालक, हाऊसिंग सोसायट्या त्यांच्याकडे भाड्याने राहणारे डॉक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे पूर्णतः चुकीचे असून संबंधीत घरमालक, हाऊसिंग सोसायट्या यांनी असे करु नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. एखादे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटी असे करत असल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
भाड्याच्या घरात राहणारे डॉक्टर, नर्सींग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना असा अनुभव आल्यास त्यांनी आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
करोनाबधित 15 रुग्णांना डिस्चार्ज
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई, दि. 26 : राज्यात करोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत 15 करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. मुंबईत 1 आणि ठाणे येथे 1 रुग्ण आढळून आला आहे.
डिस्चार्ज देण्यात आलेल्या 15 रुग्णांचे नमुने आधी पॉझीटीव्ह आले होते. त्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता 14 दिवसानंतरचे त्यांचे दोन्ही नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना अजुन पुढील 14 दिवस घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
काल पुण्यात दोघा करोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.
राज्यातील 8 खाजगी लॅबना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई, दि. 26 : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील 27 खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे 8 लॅब महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. या खाजगी तपासणी केंद्रांना केंद्र शासनाने करोना तपासणी केंद्र’ म्हणून मान्यता देण्याची शिफारस राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केंद्र शासनाकडे करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड, नवी मुंबई, सबर्बन डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, मुंबई, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, नवी मुंबई, एस. आर. एल. लिमिटेड, मुंबई, ए.जी. डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबरोटरी, मुंबई आणि इन्फेक्शन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे या खासगी लॅबचा यात समावेश आहे. यामुळे करोना तपासणी अधिक जलद गतीने होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होतील. ही तपासणी केंद्रे पूर्ण क्षमतेने चालविल्यास दररोज एकूण 2 हजार संशयित रुग्णांचे नमुने तपासणी करणे शक्य होणार आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास उघडी ठेवणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कुठेही गर्दी होता कामा नये अशा सूचना
मुंबई दि 26: सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा मालाची दुकाने, औषधांची दुकाने ही 24 तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी करोना उपाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक झाली, त्यात यावर चर्चा झाली.
लॉकडाऊनमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य खरेदी करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात, असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले.