वाशिम - मालेगाव तालुक्यातील ग्राम राजाकिन्ही येथे गेल्या वर्षभरापासून नळयोजना बंद पडल्यामुळे ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने आंदोलनाचे पाऊल उचलले असून येत्या सात दिवसात बंद पडलेली नळयोजना सुरु करुन पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हा परिषदेवर घागर घेवून धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आले आहे.
यासंदर्भात ९ फेब्रुवारी रोजी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात संगीता चव्हाण, सिता धंदरे, वंदना अक्कर, बेबी धुळधुळे, वनिता पांडे, प्रमिला इंगळे, छाया सोनोने, सारीका बावणे, शारदा खंडारे, संगीता नगरे, अविनाश शिंदे, विलास काळुशे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष रघुनाथ खुपसे, महेश देशपांडे आदींनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन दिले.