Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम : ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण


मुंबई, दि. ८ : "सर्वांसाठी आरोग्य" धोरणाला चालना देण्यासाठी  आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्य विकास प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. राज्यातील ३४८ इतकी वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये तसेच उत्कृष्ट खाजगी रुग्णालये यांना प्रशिक्षण केंद्र म्हणून नोंदीत करण्यात आले असून यामाध्यमातून प्रशिक्षणासह ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरीता सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण ५०० प्रशिक्षण केंद्रे कार्यन्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांमधून २० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे उद्धिष्ट आहे. यातील ५ हजार उमेदवारांना पहिल्या टप्प्यात  प्रशिक्षण देण्यात येईल. दर्जेदार पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये उमेदवारांना हे प्रशिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल. प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता राज्यातील युवक, युवतींनी कौशल्य विकास विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी.