Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे तिहेरी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी - अविनाश वानखेडे : लॉकडाऊन काळातील व त्यापुढील तीन महिन्याचे विज बिल माफ करण्याची मागणी : विविध मागण्यांसाठी बहूजन समाज पार्टीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


वाशीम - राज्यात भाजपाच्या राजकारणाला वैतागलेल्या जनतेने कुणालाही बहूमत दिले नाही. त्यामुळे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉगेसचे तिहेरी सरकार अस्तित्वात आले असून हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून जनतेला पश्चाताप झाला असल्याचा आरोप बहूजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव अविनाश वानखेडे यांनी केला आहे. यासोबतच राज्यातील आदिवासी, मागासवर्गीयांवर होणारे अत्याचार थांबवून हे खटले जलदगती न्यायालयात चालविण्याच्या मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी वानखेडे यांच्या पुढाकारात बहूजन समाज पार्टीच्या वतीने ७ जुलै रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.



    बहूजन समाज पार्टीच्या प्रमुख बहन मायावती यांच्या निर्देशानुसार तसेच राज्य प्रभारी खा. अ‍ॅड. विरसिंह, प्रदेश अध्यक्ष संदीप ताजणे यांच्या मार्गदर्शनात प्रदेश सचिव अविनाश वानखेडे यांनी प्रशासनापुढे विविध मागण्या मांडल्या आहेत.



यामध्ये, आदिवासी, मागासवर्गीयांवरील खटल्यासाठी तज्ञ वकीलांची नियुक्ती करुन दोषींना दंडीत करावे, कोरोना संक्रमीत रुग्णांना १ लाख रुपयापर्यत मोफत उपचार व कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, राज्यातील इंधन दरवाढ त्वरीत आटोक्यात आणण्यासाठी विशेष उपाययोजना करावी, कोरोनामुळे लॉकडाऊन काळातील व त्यापुढील तीन महिन्याचे विजबिल माफ करा, शैक्षणिक वर्ष १९-२० व २०-२१ चे सर्व शैक्षणिक शुल्क माफ करुन विद्यार्थ्यांना विशेष सवलती व शिष्यवृत्ती द्या, ठप्प झालेले लघुउद्योग, बांधकाम मजुर, बारा बलुतेदार यांना विशेष सवलती व अनुदान द्या, सर्व जिल्हानिहाय सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलची कायमस्वरुपी बांधणी व संचलन करा, राज्यातील शेतकर्‍यांना नविन अनुदान, पिककर्ज उपलब्ध करुन द्या, गृहकर्ज, वाहनकर्ज, तारणकर्ज, सक्षमउद्योग कर्ज, बचतगट कर्ज आदींचे सहा महिन्याचे कर्ज हप्ते माफ करा, रिक्षा, टॅक्सी, टेम्पो आदी वाहनांचे सहा महिन्याचे कर्जहप्ते माफ करुन त्यांना नगदी अर्थसहाय्य करा, बोगस बि-बियाणे पुरवुन शेतकर्‍यांना फसविणार्‍या बियाणे कंपन्यांविरुध्द गुन्हे दाखल करुन त्यांचे परवाने रद्द करा व डिसेंबरपर्यत सर्वाना मोफत धान्य देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाव्दारे बसपाच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर हरिभाऊ राऊत, प्रा. उमेश कुर्‍हाडे, शमशेद खान, संतोष वाठोरे, आनंद वर्घट, लालु गवई, नितीन ताजणे, विनोद अंभोरे, सतिश गवई, प्रकाश दवडगे, बंडु वानखडे, प्रकाश आठवले, राजेश कांबळे, धिरज मोरे, रवि राऊत, मंगेश साबळे, मोरे आदींसह बसपा कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.