Ticker

6/recent/ticker-posts

‘वसंत’ च्या आगमनाने उजळला झोपडीतल्या भाकरीचा चंद्र : खाकी वर्दीतील कर्तव्याला माणूसकीची झळाळी : जिल्हयात जवळपास दहा हजार किटचे वितरण


‘वसंत’ च्या आगमनाने उजळला झोपडीतल्या भाकरीचा चंद्र
खाकी वर्दीतील कर्तव्याला माणूसकीची झळाळी : जिल्हयात जवळपास दहा हजार किटचे वितरण
वाशीम - करोना महामारीमुळे जिल्हा लॉकडाऊन असतांना हातावर पोट असणार्‍या जिल्हयातील श्रमिक, कामगारांच्या कुटुंबांना जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या पुढाकारातुन व प्रत्यक्ष भेटीतून आजवर तब्बल १० हजाराच्या जवळपास धान्य व किराणा किटचे वितरण करुन त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस विभागाच्या या कामगिरीमुळे जिल्हयातील शेकडो निराधार कुटुंबांच्या जेवणाचा प्रश्‍न सुटला असून खाकी वर्दीतील कर्तव्याला माणूसकीची झळाळी लाभली आहे.
 कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवरील लॉकडाऊन परिस्थितीत विविध समाजसेवी संस्था, समाजसेवक गरजवंतांच्या मदतीला धावून जात आहेत. परंतु अजुनही अनेक कुटुंबे मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्याचबरोबर शहरातील आणि शहराबाहेरील अनेक गरजवंत व गावो गावी फिरून टोपली, सूप, फडे विकणारे, भांडे विकणारे, मनी पोत डोरले विकणारे, पालात राहणार्‍या कुटुबांपर्यत अजुनही मदत पोहचलेली नाही. जिल्हयात कायदा व सुव्यवस्था जाणून घेण्याच्या दृष्टीने दररोजच्या आपल्या पेट्रोलिंग दरम्यान जिपोअ वसंत परदेशी यांनी या मदतीची आस लावून बसलेल्या या कुटुंबांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांच्या पुढाकारातुन आणि सामाजिक संस्थांना सोबत घेऊन या वस्त्यांमधील अशा गोरगरीब कुटुंबांना आरोग्याच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझर व अन्नधान्य किटचे थेट वितरण करण्यात आले. २ एप्रिलपासून आजवर किमान ९,६४९ धान्य व किराणा असलेल्या किटचे वाटप करुन गरजवंतांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्‍न सोडविण्यात आला आहे. पोलीस कायद्याचे पालन करुन केवळ गुन्हेगारांना शासनच करतात असे नव्हे तर आपातकालीन परिस्थितीत गरजवंतांच्या मदतीसाठी धावुनही जातात हे वाशीम जिल्हा पोलीस विभागाच्या कामगिरीवरुन दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांनी या श्रमिकांच्या सहवेदना समजून या वेदनांवर माणूसकीची फुंकर घातली असून यामुळे ‘वसंत’ च्या आगमनाने उजळला झोपडीतल्या भाकरीचा चंद्र’ असे म्हणणे सार्थ ठरले आहे.