Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा व शहर वाहतूक पोलीस बांधवांना पांढर्‍या शेल्याचे वितरण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचा उपक्रम


महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा व शहर वाहतूक पोलीस बांधवांना पांढर्‍या शेल्याचे वितरण
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचा उपक्रम
वाशिम - १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या संयुक्त आयोजनातून कोरोनाच्या लढाईत लॉकडाऊनमध्ये नागरीकांच्या सुरक्षीततेसाठी आपल्या घरीच राहावे या दृष्टीने रस्त्यावर अहोरात्र सेवा देणार्‍या जिल्हा व शहर वाहतूक शाखेच्या पोलीस बांधवांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी पांढर्‍या शेल्याचे वितरण करण्यात आले.
 कोरोना विषाणूचा संसर्ग नागरीकांना होवू नये यासाठी संपूर्ण जिल्हयात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये नागरीकांनी अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर निघू नये यासाठी राज्य राखीव दलाचे जवान, जिल्हा पोलीस आणि जिल्हा व शहर वाहतुक शाखेचे पोलीस बांधव एप्रिल, मे महिन्याच्या कडक उन्हामध्येही रस्त्यावर उतरुन अहोरात्र कर्तव्य करीत आहेत. तळपत्या उन्हात ड्युटी करणार्‍या या पोलीसांना उन्हापासून संरक्षण व्हावे या दृष्टीकोनातून शहरातील ठिकठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वाहतुक शाखेच्या पोलीसांना पांढर्‍या शेल्याचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा वाहतुक शाखेचे पीआय राठोड, पोलीस शिपाई मयुर राठोड, सज्जन फुफटे, आकाश पाईकराव, समाधान जायभाये, शहर वाहतूक शाखेचे एपीआय वाटाणे, पोलीस शिपाई अंकुश चव्हाण, रवि खडसे, सुभाष नरवाडे, वसंत तहकीक यांच्यासह ५४ पोलीस बांधवांना पांढर्‍या शेल्याचे वितरण करण्यात आले. या सामाजीक उपक्रमात मनसेचे पदाधिकारी मनिष डांगे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, गजानन वैरागडे, विजय नाईकवाडे, किशोर गजरे, वृषभ बेलोकार आदींनी सहभाग घेतला.