Ticker

6/recent/ticker-posts

विद्युतचलित कडबा कुट्टी यंत्रांचे पशुपालकांना होणार वाटप


विद्युतचलित कडबा कुट्टी यंत्रांचे पशुपालकांना होणार वाटप
३१ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
वाशिम, दि. २० : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सन २०१९-२० मध्ये २ एच.पी. क्षमतेच्या विद्युतचलित कडबा कुट्टी यंत्रांचे पशुपालकांना वितरण करावयाचे आहे. याकरिता पशुपालकांनी ३१ मार्च २०२० पर्यंत आपले विहित नमुन्यातील अर्ज संबंधित पशुवैद्यकीय संस्थेचे संस्था प्रमुख, सर्व पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. एस. बोरकर यांनी केले आहे.
विद्युतचलित कडबा कुट्टी यंत्रासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जाती, जमातीच्या पशुपालकांना योजनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सरसकट ५० टक्के अनुदान जास्तीत जास्त ८ हजार रुपये मर्यादेपर्यंत देय राहील. सदर योजनेचा लाभ घेतांना पशुपालकाकडे किमान १० जनावरे उपलब्ध असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यींना विद्युतचलित कडबा कुट्टी यंत्र स्वतः खरेदी केल्यास ८ हजार रुपयेपर्यंतचे अनुदान डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.
लाभार्थ्यांनी भरावयाच्या अर्जाचा नमुना संबंधित पशुवैद्यकीय संस्थेच्या संस्था प्रमुखाकडे तसेच सर्व पंचायत समिती कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे २५ मार्च २०२० पर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. अर्जासोबत जमिनीचा सातबारा, विद्युत देयकाची झेरॉक्स प्रत, कमीत कमी १० जनावरे असल्याबाबत पशुधन विकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, शासनाकडून पुरविण्यात आलेल्या कडबा कुट्टी यंत्रामुळे काही शारीरिक दुखापत झाल्यास शासनाकडे कोणताही दावा करणार नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, कडबा कुट्टी यंत्राच्या किंमतीच्या ५० टक्के रक्कम स्वतः भरण्यास तयार असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, कडबा कुट्टी यंत्राद्वारे जी कडबा कुट्टी तयार होईल, ती मी माझ्या जनावरांना खाऊ घालीन, असे प्रतिज्ञापत्र अर्जासोबत जोडावे. ३१ मार्च २०२० नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बोरकर यांनी केले आहे.